छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः सन २०१७ साली तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने शहराच्या पाणी योजनेला मोठा निधी देत कायन्वित केली. मात्र नंतर आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष या योजनेला थंडबस्त्यात टाकले. परिणामी या योजनेला उशीर झाला. त्यामुळे शहरवासियांना तहानलेले ठेवण्यास तत्कालीन महाविकास आघाडीचे अर्थात उद्धव ठाकरे यांचे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, ही योजना देवेंद्र फडणवीस यांनीच मंजूर केली होती. त्यानुसार कामही सुरू झाले होते. मात्र उद्धव ठाकरे सरकार येताच योजनेचे काम थांबले. तब्बल अडीच वर्षे काम होऊ शकले नाही. आमचे सरकार येताच पुन्हा वेगात काम झाले. कालच विद्यूत पंपाची चाचणी यशस्वी झाली असून पुढच्या दोन महिन्यात नागरिकांना पाणी मिळेल. ठाकरेंनी अडीच वर्षे काम बंद ठेवून शहराचे नुकसान केले,असा गंभीर आरोप त्यांनी केला.
नागरिकांना मिळणार पीआर कार्ड...
शहरातील जुन्या मालमत्तांच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीआर कार्डच्या समस्येसाठी आता ड्रोन सर्वेक्षण केले जाणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शहराचा नवा नकाशा तयार केला जाईल, ज्यामुळे मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नाते महाराष्ट्राने स्वीकारले आहे असेही ते म्हणाले.
लोक ठाकरेंना फक्त ऐकायला येतात...
मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली आहे. कालची सभाही तुफान गर्दीची झाली याकडे लक्ष वेधता बावणकुळे म्हणाले, सभेला गर्दी जमते म्हणजे मते मिळतात असे नाही. लोक ऐकायला येतात, पण मतदान करताना कमळाचा आणि विकासाचाच विचार करतात, असा टोला त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना लगावला.
टोकाची टिका नको...
महापालिका निवडणूकीत राज्यात काही ठिकाणी मित्र पक्षांसोबत मैत्री पूर्ण लढत होत आहे. निवडणूक प्रचारात मित्र पक्षावर टिका करताना जपून शब्दप्रयोग करावेत अशी सुचना नेते कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. विकासाचा मुद्दा हाच प्रमुख अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत असे ते म्हणाले.














